Home » लिफ्टमध्ये आरसा का लावला जातो,जाणून घ्या यामागील कारण…!
Infomatic

लिफ्टमध्ये आरसा का लावला जातो,जाणून घ्या यामागील कारण…!

आधुनिक काळात औद्योगीकरण,शहरीकरण यामुळे शहरातील लोकसंख्येचा प्रश्न व राहण्याची समस्या निर्माण झाली.यातूनच गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या.सध्याच्या काळामध्ये केवळ मेट्रोपोलिटन शहरांमध्येच नव्हे तर अगदी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा अनेक मजले असलेल्या इमारती बांधल्या जातात.या इमारतींमध्ये खालीवर ये-जा करण्यासाठी लिफ्टची सुविधा केलेली असते.या लिफ्ट मुळे आपण एका क्षणात खालच्या मजल्यावरून अगदी सर्वात वरच्या मजल्यापर्यंत आरामात जाऊ शकतो.यामुळे आपल्या जिन्याच्या पाय-या चढण्याचे कष्ट वाचतात व वेळही वाचतो.या लिफ्ट मध्ये आपण एक आरसा नेहमी पाहतो.लिफ्ट मध्ये जे येण्याजाण्याचे साधन आहे त्यामध्ये आरसा का लावला जातो याचा आपण कधी विचार केला आहे का. यामागील कारण आज आपण जाणून घेऊया.

सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा लिफ्ट सर्वात प्रथम बसवल्या गेल्या तेव्हा या साधनाच्या वापराबद्दल वापर करणार्‍यांमध्ये खूप संभ्रम होता.सुरुवातीच्या काळामधील लिफ्ट जिन्यापेक्षा वरती जाण्यास नक्कीच कमी वेळ लावत होत्या मात्र एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर गेल्यावर थांबण्या मध्ये जो वेळ जात होता त्यामुळे लोक काहीसे चलबिचल होत असत.यातूनच या लिफ्टचा वेग वाढविण्याचा विचार समोर आला.मात्र एका अभियंत्याने यावर असा सल्ला दिला कि लिफ्टचा वेग वाढवण्यापेक्षा लिफ्ट मध्ये जर आरसा लावला तर लोकांचे लक्ष स्वतःला न्याहाळण्या मध्ये जाईल व यामुळे त्यांना जो काही सेकंदांचा वेळ वाया जात आहे त्याचा फारसा फरक पडणार नाही व म्हणूनच प्रायोगिक तत्त्वावर लिफ्टमध्ये आरसे बसवले गेले व ते निश्चितच फायदेशीर ठरले.

लिफ्टमध्ये आरसा बसवल्यानंतर लिफ्टमध्ये असलेल्या अन्य व्यक्ती काय करत आहेत यावरही नजर ठेवली जाऊ शकते. यामधून कधीकधी चोरीसारख्या घटनाही उघडकीस येतात.जपानमध्ये लिफ्टचा वापर हा प्रामुख्याने लिफ्टमध्ये व्‍हीलचेअरवर बसलेल्‍या व्यक्तींसाठी केला जातो.व्हीलचेअरवर बसलेल्‍या व्यक्ती आरशाच्या मदतीने न वळताही आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने मागे व पुढे कोण आहे व किती अंतरावर आहे हे सहजपणे पाहू शकते.

लिफ्ट मधील आरशामध्ये एक प्रकारच्या दृष्टी आभासा चा प्रत्यय येतो.यामुळे जेव्हा लिफ्ट वरती जात असते त्यावेळी ज्या व्यक्तींना उंचीचा फोबिया असतो त्यांचे लक्ष विचलित होते व त्यांना भीती वाटत नाही.लिफ्टमध्ये असलेल्या कमी जागेमुळे ज्या व्यक्तींना उंच जागेवर जाण्याचा फोबिया असतो त्यांना घाबरल्यासारखे होऊ शकते.लिफ्ट मधील आरशामुळे जागा जास्त असल्याचा आभास निर्माण होतो व एक प्रकारची सुरक्षिततेची भावना निर्माण होते.लिफ्टमध्ये आपल्याला इच्छित मजल्यावर पोहोचेपर्यंत निर्माण होणाऱ्या कंटाळवाणेपणा च्या भावनेपासून आरसा आपल्याला दूर ठेवतो.आरशामध्ये पाहून आपण स्वतःचा चेहरा व लुक काहीसा नीट करू शकतो.