विवाह हे प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचे नाते असते व असे पाहिले गेले आहे की विवाहबद्ध झाल्यानंतर स्त्री किंवा पुरुष यांचे पुढील आयुष्य हे त्यांच्या वैवाहिक नात्यावरच अवलंबून असते.त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की आपल्याला असा जोडीदार मिळावा जो आपल्याला पूर्णपणे समजून घेईल.हिंदू धर्मा मध्ये विवाहाच्या विविध प्रथा व पद्धतींचे पालन केले जाते.हिंदू धर्माप्रमाणे विवाहबद्ध होताना स्त्री आणि पुरुष हे सात फेरे घेतात.या प्रत्येक फेऱ्या मध्ये एक वचन ते एकमेकांना देत असतात.या सात फेरे घेण्यामागचा नक्की अर्थ काय हा प्रश्न बऱ्याचदा पडतो.आज आपण सप्तपदीच्या किंवा सात फेरे यांच्या सात वचनांचा अर्थ समजून घेणार आहोत.
१) सप्तपदी च्या पहिल्या फेऱ्या मध्ये किंवा वचनामध्ये वधू-वराला असे म्हणते की आजच्या प्रमाणेच पुढील संपूर्ण वैवाहिक आयुष्यामध्ये कोणतेही धार्मिक कार्य,व्रत किंवा उपवासामध्ये पूजेच्या वेळी मला तुमच्या डाव्या बाजूला स्थान दिले जावे व जर तुम्ही कधी भविष्यात तीर्थयात्रेला गेलात तर मला तुमच्या सोबत न्यावे जर तुम्हाला हे मान्य असेल तर मी तुमच्याशी विवाह करण्यास तयार आहे.
२) सप्तपदी च्या दुसऱ्या वचनामध्ये वधु असे म्हणते की ज्याप्रमाणे आपला भावी पती हा त्याच्या आई-वडिलांचा आदर व मानसन्मान ठेवतो त्याच प्रमाणे त्याने पत्नीच्याही मातापित्यांचा आदर व मान ठेवावा.त्याचप्रमाणे कुटुंबाच्या चालीरीती प्रमाणे सर्व धार्मिक कार्य ही पार पडावेत हे वचन मान्य असेल तर वधू वरा सोबत येण्यास तयार आहे.
३) सप्तपदी च्या तिसऱ्या वचनामध्ये वधू वराकडे तारुण्यावस्था प्रौढावस्था व वृद्धावस्था या तीनही अवस्थांमध्ये तिची साथ देण्याचे वचन मागते व यासाठी जर वर राजी असेल तर ती त्याच्याशी विवाह बंधनात अडकण्यास तयार आहे.
४) चौथ्या वचनामध्ये वधु असे म्हणते की वैवाहिक आयुष्य सुरू झाल्यानंतर कुटुंबाप्रती च्या सर्व जबाबदाऱ्या पतीच्या खांद्यांवर येतील व या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तो सक्षम असेल तर ती त्याच्या आयुष्यात येण्यास तयार आहे.
५) सप्तपदी च्या पाचव्या वचनामध्ये वधू वराकडे कौटुंबिक आयुष्यामध्ये सुखी ठेवण्याचे वचन मागते.या वचनामध्ये वधु असे म्हणते की वैवाहिक आयुष्य मधील कोणतेही आर्थिक खर्च,देण्याघेण्याचे व्यवहार,विवाह समारंभातील खर्च,धार्मिक कार्यातील खर्च करण्याअगोदर पतीने तिचे सुद्धा मत विचारात घ्यावे.
६) सप्तपदीच्या सहाव्या वचनामध्ये वधू वरा कडून त्याने स्वतःला जुगार व्यसन इत्यादी वाईट सवयींपासून दूर ठेवावे असे वचन घेते तसेच जर ती अन्य महिलांसोबत वार्तालाप करत असेल तर त्यावेळी इतरांसमोर तिचा अपमान करू नये अशी अपेक्षा सुद्धा ती करते.
७) सातव्या वचनामध्ये स्त्री पतीला असे वचन मागते की वैवाहिक आयुष्य सुरू झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीला पती मातेसमान मानेल व पती आणि पत्नीच्या मध्ये कोणत्याही तिसऱ्या स्त्रीच्या समावेश केला जाणार नाही व ही सर्व वचन मान्य असतील तर वधू वरा सोबत विवाह करण्यास राजी आहे.
Add Comment